शब्दफुले ...........
कुठे तरी रुजतात मनात खोलवर शब्दांचे उमाळे! स्वतःचा स्वतःशीच सुरु होतो शब्दखेळ! हातात लेखणी घेतली की शब्द गायब होतात आणि मनात विचारांनी गर्दी केली की सुरु होते लेखणी गवसण्याची धडपड! वाटतं
खूपदा आपणही बनावे लेखक किंव्हा कवी! मग वाटत मनातल्या विचारांची गाणीच बरी! कधी वाटत छापावे आपणही एखादे पुस्तक, तर कधी करावा भव्यदिव्य पुस्तक प्रकाशन सोहळा.
मग शब्दच म्हणतात,"नकोच , वहीतच आम्ही बरे". आपले एकटे, उबदार पानांमध्ये पहुडलेले स्वतःच्याच विचारात हरवलेले स्वतःशीच बोलणारे, स्वप्नांमध्ये विहरणारे.....
मग भरत राहते काळ्या शाईने रिकामे कागद! वाचते पुन्हा पुन्हा स्वतःशीच, स्वतःवरच खूष होत... बोलते मग माझ्यातल्याच माझ्याशीच...
पण आता, शब्दाच्या ह्या खेळात मीही सामील व्हायचे ठरवलंय...बघूया जमतंय का? बांधायला कवितांच्या ओळी, नाहीच जमल्या तर ठरतील वेड्या वाकड्या शब्दांच्या रांगा!मनातल्या विचारांसकट खूप खूप लिहायचं,
लिहायचं मला पानगळीच्या मौसमात गळणाऱ्या प्रत्येक पानावर, रंगांच्या दुनियेत रंगणाऱ्या इंद्रधनुष्यावर, पारिजातकाच्या सुगंधावर,मारव्याच्या चीजेवर, उलगडायचा आहे मला प्रत्येक गोष्टीचा नव्याने अर्थ अनुभवायची आहे मला शब्दांची अनुभूती!
बघूया जमतंय का या शब्दांचे घर बांधायला, नाहीच जमले तर शब्दांची गवत फुले तरी असतील कायमच माझ्याजवळ, माझी आपली शब्दफुले..........
तुझ्या ब्लोग चा ’अधश्री’ झाला तर.ब्लोग लिहिताना, photo add करताना ईत्यादी मधे कसलीही मदत लागली तर सांग.
उत्तर द्याहटवाअभिनंदन आणि शुभेच्छा !